हडपसर – जपानच्या योकोहामा शहरात आधुनिक तंत्रज्ञान वापरून कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू आहे. याच धर्तीवर हडपसरमध्येही हा प्रयोग होऊ शकतो. यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली.
जपान अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आमदार तुपे यांनी इतर विधिमंडळ सदस्यांसह नुकतीच योकोहामा शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर अत्याधुनिक शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून सिमेंट, वीज, रस्ता बांधणीसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यात येतो. या प्रकल्पात कुठेही कचरा दिसत नाही. संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित यंत्रणेवर आधारित असून अतिशय स्वच्छ, नेटक्या पद्धतीने चालविण्यात येतो, असे आमदार तुपे म्हणाले.
योकोहामा शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली. आपणही असा प्रकल्प उभारून तो सुरळीत सुरू ठेवू शकतो, हे लक्षात आले. हडपसरमध्येही असा कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आमदार तुपे यांनी सांगितले.