मुंबई – आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनचे दमदार अर्धशतक व त्याला अभिषेक शर्मा आणि निकोलस पूरन यांनी दिलेली सुरेख साथ यांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यासह हैदराबादने यंदाच्या स्पर्धेतील आपला दुसरा विजय साकार केला. मात्र, विजयाच्या जल्लोषात संघाला मोठा धक्का बसला आहे. हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हाताच्या दुखापतीमुळे किमान पुढील दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
सोमवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्याने त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने 3 षटक टाकत केवळ 14 धावा दिल्या, परंतु त्याला विकेट घेण्यात अपयश मिळाले.
सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक मूडी यांनी सामन्यानंतर सुंदरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली. त्यांनी सांगितले की, सुंदरला उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार आहोत. आशा आहे की ही दुखापत फार मोठी नसावी. मात्र, पूर्ण बरे होण्यासाठी त्याला सुमारे एक आठवडा लागेल. अशी शक्यता मूडी यांनी व्यक्त केली आहे.
हैदराबादकडे श्रेयस गोपाळ यांचा पर्याय उपलब्ध
सनरायझर्सला त्यांच्या पुढील दोन सामन्यांमध्ये शुक्रवारी आणि रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जचा सामना करावा लागणार आहे. चालू मोसमात सनरायझर्सने सुंदरला फक्त स्पेशल फिरकीपटू म्हणून संघात स्थान दिले होते. आता सुंदरच्या जागी हैदराबादचा संघ श्रेयस गोपालचा विचार करू शकतो.
वॉशिंग्टन सुंदर या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. पावरप्लेमध्ये विकेट्स घेण्याबरोबरच त्याने खालच्या फळीत बॅटने योगदान दिले आहे. सुंदरने या हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळला आहे. यामध्ये फलंदाजीत एकूण 58 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत एकूण 14 षटक टाकले असून 4 विकेट घेतल्या आहेत.