दुबई – भारतीय संघाचा येत्या रविवारी न्यूझीलंडशी सामना होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. न्यूझीलंडचा अत्यंत भरात असलेला सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टील दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.
अमिराती येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील सुपर 12 फेरीचे सामने खेळले जात आहेत. ब गटामध्ये समावेश असलेल्या भारतीय संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच न्यूझीलंडवरही पाकिस्तानने मात केली होती. त्यामुळे या दोन्ही संघांना रविवारी होणारा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. न्यूझीलंड संघाचा अनुभवी व आक्रमक सलामीवीर मार्टिन गुप्टील भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याने न्यूझीलंड संघालाही दडपणाचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याचा यॉर्कर चेंडू गुप्टीलच्या पायाच्या घोट्याला लागला होता. त्याने यानंतरही फलंदाजी केली. मात्र, त्याला क्षेत्ररक्षण करताना त्रास जाणवू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो फिट ठरेल असे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष त्याच्या पायाचे स्कॅनिंग केल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
गुप्टील हा न्यूझीलंडचा टी-20 सामन्यांतील सर्वांत यशस्वी फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत न्यूझीलंडसाठी 2 हजार 956 धावा केल्या आहेत. तो भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही तर न्यूझीलंडला हा दुसरा धक्का बसणार आहे. यापूर्वी त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.