शहरातील नवे हॉटस्पॉट जाहीर
पुणे – शहरात आता ठराविक भागातच करोनाचा प्रसार होतो आहे असे चित्र नसून, बाधित हॉटस्पॉट वाढले आहेत. नवे हॉटस्पॉट महापालिकेने जाहीर केले आहेत.
शहरातील करोनाचे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दाट वस्तीचा प्रभाग क्रमांक 20 ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पीटल याप्रभागात सर्वात जास्त 681 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरात सर्वांत कमी रुग्ण हे औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील 42 प्रभागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वांत कमी म्हणजे केवळ 1 रुग्ण आढळला आहे.
महापालिका प्रशानाने 17 मे पर्यंतची प्रभाग निहाय आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये 3 हजार 509 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. शहरात सर्वाधिक रुग्ण सध्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. येथील रुग्णांची संख्या एकूण 700 इतकी आहे. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क याठिकाणी 19 रुग्ण, तर, प्रभाग क्रमांक 20 मध्ये ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, रेल्वे स्टेशनचा परिसर, आणि काही झोपडपट्यांचा भाग येतो. त्यामुळे येथील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने हा भाग सील केलेला आहे. महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवल्यामुळे काही प्रभागात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. प्रभाग क्रमांक 22 मुंढवा याठिकाणी गेल्या आठ दिवसामध्ये केवळ 1 रुग्ण सापडला आहे, प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर 2, बाणेर प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकही रुग्ण आठ दिवसांत सापडला नाही.