पुणे पोलिसांकडून वाहन जप्तीची कारवाई सुरू
संबंधितांवर गुन्हेही दाखल होणार
पुणे – वारंवार आवाहन करूनही अनेकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी थेट वाहन जप्त कारवाई सुरू केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. याबाबत पोलिसांनी घरामध्ये राहा, “विनाकारण बाहेर पडू नका’ असे एकनाअनेक प्रकारांद्वारे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पण या नियमाला काही निष्काळजी नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे.
संचारबंदीच्या या काळात सुरुवातीला अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यतिरिक्त सोडून अन्य नागरिकांसाठी वाहतूक बंद केली. रस्त्यावर वाहने घेऊन कोणी फिरू नये, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंधने घातली. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना काठीचाही “प्रसाद’ दिला. पण नागरिकांवर याचाही परिणाम झालाच नाही. देशात लॉकडाऊन जाहीर होऊनही पुणेकरांकडून नियमांचे उल्लंघन होत असून, क्षुल्लक कारणे देत नागरिक रस्त्यांवर वावरत असल्याचे चित्र आहे.
यामुळे सोमवारी पुन्हा पुणेकरांनी विविध कामांच्या बहाण्याने वाहनांचा वापर करत संचार केला. बेशिस्तांच्या या वर्तणुकीला आळा घालण्यासाठी आता पुणे पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, शहराच्या विविध भागांतून सुमारे 500 हून अधिक वाहने पोलिसांनी जप्त केली. याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहनमालकांवर कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.