वॉशिंग्टन – करोना रोगामुळे जगभरातील सारे व्यवहार ठप्प झाले असून त्यामुळे चीन, पूर्व अशियातील देश, आणि पॅसिफिक देश अशा भागातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून त्यातून या देशांमधील गरीबीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते, असा इशारा जागतिक बॅंकेने दिला आहे. दोन दशकांपूर्वी अशियात करन्सी क्रायसिस निर्माण झाला होता त्यावेळी अर्थव्यवस्थेवर जो भीषण परिणाम झाला होता त्यापेक्षा करोनाचा प्रभाव अधिक भीषण असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
या बॅंकेच्या अंदाजानुसार अशिया-पॅसिफीक विभागाचा विकास दर यामुळे 5.8 टक्क्यांवरून 2.1 टक्के इतका खाली येईल असा अंदाज आहे. अशियातील देशांमध्ये सन 1997-98 मध्ये मोठीच चलन समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्यावेळी जगातील चाळीस टक्के देशांत मंदीचे वातावरण निर्माण झाले होते. या आर्थिक संकटाच्या वातावरणात या भागातील किमान 1 कोटी 10 लाख लोक दारिद्य्ररेषेच्या खाली जाण्याचा धोका आहे.
वास्तविक येत्या आर्थिक वर्षात या देशांचा एकत्रित जीडीपी जरी 5.8 टक्के राहिला असता तरी या देशांमधील साडे तीन कोटी लोक दारिद्र रेषेच्या बाहेर येण्याची शक्यता होती. आता ती शक्यता मावळून उलट दारिद्य्ररेषेच्यावर असलेले 1 कोटी 10 लाख लोक पुन्हा दारिद्य्ररेषेखाली जाण्याचा धोका आहे. करोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांमुळे केवळ या भागातील देशच नव्हे तर संपुर्ण जगातील आर्थिक क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे.
हा फटका नेमका किती असेल याचा अंदाज घेण्याचे काम जागतिक बॅंकेकडून केले जात आहे. मात्र ही स्थिती सन 2008 च्या जागतिक मंदीच्या स्थिती, पेक्षा भीषण असेल असेही भाकीत काही जणांकडून वर्तवले गेले आहे.