वाघोली (प्रतिनिधी) : पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून नुकताच समावेश झालेल्या वाघोली गावची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, रस्ते, बंदिस्त गटार योजना, इमारत बांधकाम व दिवाबत्ती खर्च यासाठी ग्रामनिधीतून जवळपास 111 कोटी रुपयांचा निधी खर्च करून गेल्या तीन वर्षांमध्ये विकास कामांचा डोंगर रचला असल्याची माहिती वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली.
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की पाणीपुरवठ्यासाठी दोन कोटी 61 लाख रुपये, वाघोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्ते विकसित करण्यासाठी 52 कोटी 26 लाख रुपये, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बंदिस्त गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी 33 कोटी 38 लाख रुपये, वाघोलीतील विविध इमारतींच्या बांधकामासाठी सोळा कोटी एक लाख रुपये, तर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चौक व रस्त्यालगत असणार्या पथदिव्यांच्या उभारणी करतात. सात कोटी 62 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने 21 जानेवारी 2018 पासून ते 30 जून 2021 पर्यंत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये विकासकामांचा डोंगर रचला असून ग्रामपंचायतीच्या हद्दीत हद्दीत असणार्या मिळकतींची आज रोजी संख्या 41 हजार पाचशेच्या वर पोचली असून सन 21 ते 22 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीकडून नागरिकांना कराची मागणी जवळपास पन्नास कोटीच्या आसपास पोहचली असल्याची माहिती दाभाडे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांनी याबाबत वेळोवेळी केलेला पाठपुरावा नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, जिल्हा परिषद, पंचायत समिती लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार आदींचे याकामी वेळोवेळी सहकार्य व योगदान लाभले असल्याचे दाभाडे यांनी सांगितले आहे.
या शिवाय पीएमआरडीए च्या माध्यमातून वाघोली गावासाठी रस्ते विकसित करण्यासाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा, वाघोली पाणीपुरवठा योजनेसाठी 22 कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळविण्यात यश आले. तर भैरवनाथ तलाव विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पीएमआरडीए च्या वतीने देण्यात आला आहे.
पुणे महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर हाच विकासाचा आलेख सतत उंचावत ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले .