नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दोन चिमुकल्यांची हत्या करून आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रिया दहिया (वय 25, लोनी बाॅर्डर परिसर, उत्तरांचल काॅलनी, गाझियाबाद) असे महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया यांनी 18 जुलैच्या संध्याकाळी आपल्या पाच वर्षीय मुलगी आणि दिड वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केली. दोन्ही मुलांचा जीव घेतल्यानंतर तिने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तातडीने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रियाने अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्याने नातेवाईकांसह परिसरात सर्वांना मोठा धक्का बसला आहे. घरात पती पत्नी आणि मुले राहत होती. आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेऊन प्रियाने आत्महत्या का केली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. गाझीयाबाद पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.