मतदान करणे ही खूप अभिमानाची गोष्ट; नवमतदारांच्या भावना

पुणे – यंदाच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये विशेषत: तरूणाईमध्ये उत्साह दिसत होता. बहुतांश नवमतदारांनी सकाळी मतदान करण्याचा पर्याय निवडला. नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होणारी तरूणाई मतदानाच्या दिवशी देखील “ऍक्‍टिव्ह’ होती. मतदान केल्यानंतर कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींसह अनेकांनी फोटो काढून सोशल मीडियावर “अपलोड’ केले.

पहिल्यांदाच मतदान करत असल्याने आनंद, उत्साह, दडपण आणि कुतूहल असल्याचे नवमतदारांनी सांगितले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या भागाचा विचार करून अभ्यासपूर्ण मतदान करणे गरजेचे आहे, अशी “जबाबदारी’ची भावना नवमतदारांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.

मतदान हा लोकशाहीतील सर्वांत महत्त्वाचा अधिकार आहे. यापुढे देखील लोकशाहीच्या उत्सवात हे कर्तव्य बजावण्यासाठी न चुकता सहभागी होणार आहोत. पहिल्यांदा मतदान करताना आनंद झाला. संविधानाने दिलेला हा हक्क प्रत्येकाने बजावायला हवा.
– श्रुतिका घाटोळ


मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. कसे मत देतात, काय प्रक्रिया असते, व्हीव्हीपॅटचे काम कसे होते अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता होती. मतदान केंद्रांवरील अधिकारी नवमतदारांना सहकार्य करत होते. मतदान केल्यानंतर एका मोठ्या देशाचा जबाबदार नागरिक असल्याचा अभिमान वाटला.

– ईशान गोखले


आई बाबांनी जाण्याआधी थोडी कल्पना दिली होती. पहिल्यांदाच मतदान करत असल्याने थोडी भीती आणि अधिक कुतूहल होते. केंद्रावर पोलिसांच्या सहकार्यानेच बूथपर्यंत जाता आले. मतदान केल्यानंतर अभिमान वाटतच होता. मात्र त्याचबरोबर जबाबदार नागरिक असल्याची भावनादेखील होती.
– मानसी भोसले


मतदान हा आपला हक्क आहे, असे नागरिकशास्त्राच्या पुस्तकाने शाळेत असताना अनेकदा सांगितले होते. “मतदान हा हक्क आहेच, त्याहीपेक्षा आद्य कर्तव्य आहे’ अशी भावना मतदान केल्यानंतर मनात आहे. पाच वर्षांचा निवडणुकीचा कालावधी लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने अभ्यासपूर्ण मतदान करणे आवश्‍यक आहे.

– अंकिता बरशिले


पहिल्यांदा मतदान करताना खूप चांगले वाटले. मतदानामुळे जबाबदार नागरिक असल्याची जाणीव झाली. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी चांगली व्यक्ती निवडून देण्याची संधी मतदान प्रक्रियेमुळे मिळते.
– रिया हलवाई


मतदानामुळे साहजिकच जबाबदारी वाढते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी घडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यंदा खूप साम्य होते. पक्षांतर होऊनही जुनेच चेहरे दिसले, राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा वाटते.

– मिहीर मुळे


मतदान करणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपले एक मत सुद्धा सरकार स्थापन होण्यासाठी मदत करणारे असते. मतदान केंद्रांवरील अधिकारी सहकार्य करत होते. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करताना कोणतीही अडचण आली नाही. एकंदरीत मतदान प्रक्रिया अनुभवता आली, याचा आनंद आहे.
– प्राची जोशी

Leave A Reply

Your email address will not be published.