जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मतांचे भरघोस दान

विधानसभेसाठी दहा मतदारसंघात मतदानाची टक्‍केवारी वाढली

पुणे – जिल्ह्यात सरासरी 68 टक्‍केमतदान झाल्याने मतांची टक्‍केवारी वाढल्याचे समाधान निवडणूक प्रशासनास उमेदवारांनाही आहे. जिल्ह्यातील 77 लाख 29 हजार 217 मतदारांपैकी साधारणत: 47 लाख 92 हजार 114 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वांत जास्त मतदान ग्रामीण भागात झाल्याचे वृत्त आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 10 मतदारसंघ आहेत. ग्रामीण भागात सरासरी 68 ते 70 टक्‍के मतदान झाल्याचो वृत्त सायंकाळी सात वाजेपर्यंत आले होते. पावसाच्या अडथळ्यानंतरही ग्रामीण भागातील मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला. ग्रामीण भागातील मतदारसंघातील मतदानाची वाढलेली टक्केवारी लक्षात घेतली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 10 मतदारसंघात चुरशीच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंदापूर, पुरंदर, दौंड, खेड, शिरूर या मतदार संघाचा समावेश आहे. गुरुवारी (दि.24) दुपारी 5 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील. त्यानंतर विजयी उमेदवारांकडून काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांमुळे एक दिवस आगोदरच दिवाळी साजरी होणार आहे.

जिल्ह्यातील दहा मतदारसंघात एकूण 97 उमेदवार रिंगणात होते. शनिवारी (दि. 19) सायंकाळी पाचनंतर प्रचार संपल्यानंतरही रविवार (दि.20) आणि सोमवारी सकाळपर्यंत छुपा प्रचार सुरूच होता. त्यातच प्रचाराचा शेवटचा दिवस आणि रविवार अख्या दिवसावर पावसाचे पाणी पडल्याने मतदानात घट होत की काय, अशी चिंता राजकीय पक्षांसह उमेदवारांना होती. आज, (दि. 21) मतदारराजाचा दिवस उजाडल्यानंतर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची भुरभूर होती. परंतु, सकाळी 10 नंतर आकाश पूर्णत: निरभ्र होऊन पावसाचे वातावरण दूर झाले. यामुळे मतदार घराबाहेर पडू लागले. दुपारपर्यंत सर्वच मतदार संघातून 25 ते 30 टक्के मतदानाची आकडेवारी ओलांडली होती. तर, सायंकाळी सहा वाजपर्यंत आलेल्या वृत्तानुसार सर्वच मतदार संघात 60 ते 65 टक्के मतदान झाल्याचे सांगितले जात होते.

जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवार इंदापूर मतदार संघात 15 असल्याने तेथे मतांचे विभाजन अधिक प्रमाणात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातही प्रमुख लढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे उमेदवार माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातच रंगणार असल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी आणि भाजप असाच जोर आजच्या मतदानातून दिसून आला. त्यानंतर पुरंदर-हवेली, दौंड आणि जुन्नरमध्ये 11 उमेदवारांनी मतांचे दान मागितले होते.

या मतदार संघापैकी दौंडमध्ये भाजपचे उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्यातच सरळ असल्याचे आजच्या वातावरणातून स्पष्ट झाले. या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जोरदार प्रयत्न झाले. जुन्नर मतदार संघातही राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांना शिवसेनेचे उमेदवार आमदार शरद सोनवणे यांनी टक्कर दिली असल्याचे वातावरण दिसून येत होते. याच मतदार संघात अपक्षा म्हणून आशा बुचके यांच्या पारड्यातही मतदान झाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. बारामतीत दहा उमेदवार असले तर राष्ट्रवादीचे ताकदीचे उममेदवार असलेले अजित पवार यांचाच बोलबाला असल्याचे दिसत होते, त्यांना भाजपचे गोपीनाथ पडळकर किती टक्कर देतील, हे निकालातून स्पष्ट दिसणार आहे.

शिरूर-हवेलीतही चांगले मतदान झाले असले तरी येथे दहा उमेदवारांत टक्क असल्याने मत विभाजाणाची काळजी प्रमुख उमेदवारांना असणार आहे. राष्ट्रवादीचे अशोक पवार आणि भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यात कोण किती मत मिळवणार याकडे लक्ष असणार आहे. भोर मतदार संघातील मतदानाची आकडेवार 50 टक्केच्यावर असल्याने यातील कॉंग्रेस आणि शिवसेनेचा वाटा किती यावर निकाल ठरणार आहे. खेड-आळंदीत, आंबेगाव-शिरूर मतदारसंघातही सरासरी 65 ते 70 टक्के मतदान झाल्याचे वृत्त होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)