मतदारांचा अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना

वडगावशेरी मतदार संघ : मतदार स्लिप घेण्यासाठी धावपळ

पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील बहुसंख्य मतदारांना घरोघरी मतदार स्लिप न मिळाल्याने मतदान केंद्रावर स्लिप घेण्यासाठी मतदारांची धावपळ झाली. ऐनवेळी बदलण्यात आलेली मतदान केंद्रे, पावसामुळे झालेला चिखल यामुळे मतदारांना मतदानासाठी अनेक अडथळ्यांच्या शर्यतींचा सामना करावा लागला.

शासकीय यंत्रणेकडून मतदार जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात आले. मतदार स्लिप मतदारांना घरोघरी वाटप करण्याचे नियोजनही केले होते. मात्र, या नियोजनासाठी सक्षमपणे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणीच झाली नसल्याचे उघड झाले. बहुसंख्य मतदार नवीन पत्यांवर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्लिप वाटप करता आल्या नाहीत, असा दावा शासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, सोमवारी मतदानाच्या दिवशी मतदार संघातील सर्वच मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार स्लिप घेण्यासाठी गर्दी झाली होती.

मतदान केंद्राच्या बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही मतदार स्लिप वाटप करण्यासाठी बुथ उभारले होते. या बुथवरही गर्दी झाल्याचे आढळून आले. यंदाच्या निवडणुकीत मतदानासाठी सर्वच ठिकाणची मतदान केंद्रे ही तळमजल्यावर उभारण्यात आली होती. यामुळे मतदानासाठी वेळ कमी लागत होता. तळमजल्यावरील बहुसंख्य मतदान केंद्रे ही मंडप लावूनच उभारण्यात आली होती. दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी काही ठिकाणी रॅम्प उभारण्यात आले होते.

ऐनवेळी काही ठिकाणची मतदार केंद्रे बदलली
रविवारी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणच्या केंद्राच्या आवारात चिख्खल जमा झाला. यामुळे ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांना मतदानासाठी ये-जा करताना मोठी कसरतच करावी लागली. काही मतदारांनी मागील निवडणुकीतील मतदान केंद्राच्या ठिकाणीच धाव घेतली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ऐनवेळी काही ठिकाणची मतदार केंद्रे बदलली. यामुळे मतदारांना दुसरे केंद्र शोधण्याची वेळ आली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)