सकाळी शुकशुकाट; संध्याकाळी रांगा

पुणे – कमी मतदान होण्याची परंपरा या विधानसभेलाही कॅन्टोन्मेंट मतदारसंघाने कायम ठेवली असून येथे 43 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. 2014 मध्ये हे या मतदान संघात सुमारे 47.24 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मागील विधानसभेच्या तुलनेत साडेतीन टक्के कमी मतदान झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघात सकाळी सर्वच मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. तर दुपारी 1 नंतर काही भागात रांगा लागलेल्या दिसून आल्या.

तर दुपारी 3 वाजेनंतर या मतदारसंघात असलेल्या ताडिवाला रस्ता, कासेवाडी, घोरपडी गाव, डायसप्लॉट, लोहियानगर भागांत मतदानासाठी रांगा दिसून आल्या. तर सकाळच्या वेळेत सॅलिसबरी पार्क, कोरेगाव पार्क, कॅम्प, वानवडी, फातिमानगर परिसरात सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली. शेवटच्या तासाभरात या मतदारसंघात 5 टक्के मतदान वाढले.

उमेदवारांनीही बजावला हक्‍क
या मतदारसंघातून सुमारे 28 उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यात प्रमुख लढत महायुती आणि महा आघाडीच्या उमेदवारांमध्येच आहे. या मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. तर कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी गोल्डन ज्युबली ट्रस्ट भवानी पेठ येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला, नगरसेवक अविनाश बागवे, कुलदीप बागवे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

एकही तक्रार नाही…
या मतदारसंघात सुमारे 274 केंद्रावर मतदानाची सुविधा उपलब्ध होती. 15 संवेदनशील मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्तही होता. या केंद्रांच्या परिसरात एकत्रित जमावबंदी होती. त्यामुळे या सर्व केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, लोहियानगर येथे महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या सेल्फी पॉइंटवर कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी आक्षेप घेतला. या माध्यमातून भाजपची जाहिरात केली जात असल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून तातडीने हा सेल्फी पॉइंट हटवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.