Prayagraj Highway Road Accident: उत्तर प्रदेशातील प्रयागराज महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील 3 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात 14 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजता घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महामार्गावर बिकापूर कोतवालीच्या शेरपूर पाराजवळ हा अपघात झाला. सर्व भाविक कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी असून ते गुलबर्गा येथून काशीला गेले होते. काशीहून सर्वजण टेम्पो ट्रॅव्हलरमधून अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जात होते. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण 22 जण प्रवास करत होते. यावेळी टेम्पो शेरपूर पारा येथे आल्यानंतर ट्रकवर आदळला.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुलबर्गा रहिवासी शिवपूजन (56), तानसाया (45) आणि शिवराज (60) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अनुराप्पा, राजाराम, प्रीती, शिवलीला, चंद्रकांता, चंद्रमा, महादेव, इंदू यांच्यासह 14 जणांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 13 भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या एका भाविकाला जवळील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले आहे.