Delhi Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडत आहेत. यातील आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर आज सहाव्या टप्प्यातील 25 मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 8 राज्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील सात जागांवर मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.
दिल्लीतील सातही जागांवर भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये थेट लढत आहे. सकाळपासूनच येथे मतदानाला सुरुवात केली आहे. तसेच कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एकूण सात लोकसभा मतदार संघातील लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपने दिल्लीत यंदा मनोज तिवारी यांच्या व्यतिरिक्त सर्व जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या विरोधात आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्त उमेदवार उभे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आप पक्ष चार जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेस लढत आहे. Lok Sabha Elections 2024 ।
दिल्लीतील सात लोकसभा मतदार संघातील लढत
उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून भाजपचे मनोज तिवारी विरुद्ध काँग्रेसचे कन्हय्या कुमार यांच्यात थेट लढत होणार आहे. तर चांदणी चौक लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल विरुद्ध काँग्रेसचे जे पी अग्रवाल, उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपचे योगेंद्र चांदेलिया विरुद्ध काँग्रेसचे उदित राज, नवी दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपच्या बांसुरी स्वराज विरुद्ध आपचे सोमनाथ भारती यांना संधी देण्यात आली आहे.
तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघात हर्ष मल्होत्रा विरुद्ध आप कुलदीप कुमार, पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपचे कमलजित सेहरावत विरुद्ध आपचे महाबल मिश्रा आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघातून भाजपच्या रामविर सिंग बिधुरी विरुद्ध आपच्या साही राम यांच्या लढत होणार आहे. आज या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. Lok Sabha Elections 2024 ।
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील सर्व १० जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेशातील १४, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, ओडिशातील ६, झारखंडमधील ४ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. जम्मू-काश्मीरमधील १ जागा त्या प्रक्रियेला सामोरी जाईल. सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अमित शाहांचे मतदारांना आवाहन