Dr. S. Jaishankar | Lok Sabha Election 2024 : 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं असून, आता मतदान शेवटच्या टप्प्याकडे जाताना दिसत आहे.17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आज 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
सहाव्या टप्प्यात आज 8 राज्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील सात जागांवर मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर देशात नवीन सरकार स्थापन होईल.
आज देशातील 58 जागांसाठी मतदान होत असून राजधानी दिल्लीत देखील अनेक सेलिब्रेटी, राजकारणी आणि खेळाडूंनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. मात्र, यावेळी केंद्रीय मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली.
मतदान केंद्रावर एस जयशंकर पोहोचले आणि मतदानाच्या रांगेत जवळपास 20 मिनिटे उभेही राहिले, पण त्यांना त्या ठिकाणी मतदानच करता आलं नाही. मतदान न करताच त्यांना घरी जावं लागलं आणि घरी जाऊन तपास केला असता त्यांचे मतदान केंद्र वेगळं असल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
Cast my vote in New Delhi this morning.
Urge all voting today to turnout in record numbers and vote in this sixth phase of the elections. pic.twitter.com/FJpskspGq9
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 25, 2024
नवी दिल्लीतील लोकसभा मतदारसंघ-04 मतदान केंद्र क्रमांक-53 येथे एस जयशंकर यांनी मतदान केलं. त्या मतदानकेंद्रावर मतदान करणारे ते पहिलेच पुरुष ठरले. तशा प्रकारचे प्रमाणपत्रही नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने त्यांना देण्यात आलं. स्वत: केंद्रीय मंत्र्यांनी प्रमाणपत्रासह त्यांचे छायाचित्र सोशल मीडिया साइट X वर पोस्ट केले आहे.