आंदोलकांकडून जाळपोळ; दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेक
पोलीस उपायुक्तही जखमी
काही भागातील मेट्रो स्टेशन 24 तास प्रवाशांसाठी बंद
नवी दिल्ली – दिल्लीत आज पुन्हा लागोपाठ दुसऱ्या दिवशी सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमक झाली. या हिंसाचारात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला, तर पोलीस उपायुक्त जखमी झाले. गोकुळपुरी भागातील पोलीस उपायुक्त कार्यालयातील पोलीस मुख्य हवालदार रतन लाल यांचा या हिंसाचारादरम्यान मृत्यू झाला. तर आंदोलन रोखण्याच्या प्रयत्नात असताना पोलिस उपायुक्त (डीसीपी) शाहदरा, अमित शर्मा यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात पोलीसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
केजरीवालांकडून केंद्राला आवाहन
दिल्लीतील तणाव वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी त्वरित पावलेउचलावीत, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि नायब राज्यपालांना केले आहे. तर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून दिल्ली पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे नायब राज्यपाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. दिल्लीतील मंत्री आणि बाबरपूरचे आमदार गोपाल राय यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. काही लोक जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
आज सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्रीदरम्यान आंदोलकांनी जाळपोळ सुरू केली आणि दोन घरांना आग लावण्यात आली. याशिवाय अग्निशामक दलाच्या वाहनालाही पेटवण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेकीचे प्रकार घडले. दोन्ही बाजुंच्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. या घटनेनंतर आजची ही चकमक जाफराबाद आणि मौजपुर भागात झाली. त्यामुळे दिल्लीतील तणाव वाढला आहे.
दिल्लीतील जाफराबादेतील चंडिबाग आणि भजनपूर इथेही “सीएए’विरोधी आंदोलनामध्ये हिंसाचार झाला. येथेही जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीमार करावा लागला. या परिसरामध्ये जाळपोळीची घटना घडल्यावर पाचारण करण्यात आलेल्या अग्निशामक दलाचे वाहनही पेटवण्यात आले. जमावाने पोलीसांवरही चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे वृत्तवाहिन्यांवरच्या दृश्यात दिसले. जाफराबाद, मौजपुर-बाबरपूर या मार्गावरील मेट्रो स्थानके 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या स्थानकावर मेट्रो रेल्वे थांबणार नाहीत, असे मेट्रो प्रशासनाने जाहीर केले.
काल रात्रीच जाफराबाद येथे “सीएए’ समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाल्यानंतर आता दिल्लीच्या या हिंसक आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. आता दिल्लीत “सीएए’च्या विरोधात धरणे धरून बसणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी जादा सुरक्षा दले मागवून घेण्यात आली आहेत.