लखनौ – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उत्तरप्रदेशात बाबरी मशिदीच्या पर्यायी जागेसाठी जी पाच एकर जागा देण्यात आली आहे ती मान्य करण्याचा निर्णय सुन्नी मध्यवर्ती वक्फ बोर्डाने घेतला असून त्या जागेवर आता याच बोर्डातर्फे मशिद बांधली जाणार आहे.
या पाच एकर जागेवर रूग्णालय, वाचनालय आणि इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटरही उभारले जाणार आहे. बोर्डाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्तरप्रदेश सरकारने त्यासाठी जी पाच एकर जागा देऊ केली आहे ती स्वीकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूखी यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की या जागी मशिद बांधण्यासाठी बोर्डातर्फे एक ट्रस्ट स्थापन केला जाणार आहे. स्थानिक गरज लक्षात घेऊन मशिदीचा आकार ठरवला जाईल असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.