पुणे -शासकीय कार्यालयात विना हेल्मेट आलेल्या 622 कर्मचारी, अधिकाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. यासाठी शहरातील सर्व शासकीय कार्यालयात थांबून कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली. यामध्ये 73 अधिकारी सहभागी झाले होते.
मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार देशात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत बुधवारी (दि. 24) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून “लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात आला.
यामध्ये दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार सर्वांना आवहनही करण्यात आले. मात्र, काही कर्मचारी आणि कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणारे नागरिक विना हेल्मेट आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
यामध्ये 44 सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, 25 मोटर वाहन निरीक्षक आणि 4 सहाय्यक प्रादेशिक परिवहन असे एकूण 73 अधिकाऱ्यांनी विविध शासकीय कार्यालयात जावून ही कारवाई केली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. 622 व्यक्तींना विना हेल्मेटची कारवाई करीत दंड भरण्याची नोटीस दिली, असे भोर यांनी सांगितले.