पुणे, -महापालिकेकडून भवानीपेठ येथील मुख्य अग्निशमन केंद्रासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी 22 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे. राज्यातील एका बड्या “नेमबाज’ नेत्याच्या ठेकेदाराला हे काम हवे असल्याने प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे, महापालिकेने आता या कामासाठी आलेल्या पाच निविदांमधील 4 ठेकेदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राजकीय नेत्याच्या मर्जीतील ठेकेदाराकडे अनुभवाचे दाखले नसल्याचा आक्षेप इतर निविदाधारकांनी घेतल्याने चार जणांच्या निविदा रद्द करीत पुन्हा आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महापालिकेच्या भवन विभागाकडून हे काम केले जाणार आहे.
शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ही मुख्यालयाची इमारत जूनी झाली असून काही ठिकाणी मोडकळीस आली आहे. प्रत्येक वेळी डागडुजीवर खर्च करावा लागत असल्याने सध्याची इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यासाठी पालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, पालिकेने निविदा काढली आहे.
मात्र, यात राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या “नेमबाज’ नेत्याच्या ठेकेदारालाच काम देण्यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालिकेवर दबाव आणला जात आहे. या कामासाठी पाच जणांनी निविदा भरलेल्या होत्या. तर ज्या ठेकेदारासाठी हा घाट घातला आहे. त्याच्या कागदपत्रांवर इतर ठेकेदारांनी आक्षेप घेतल्याने ठेकेदारांचे “अ’पाकिट उघडून त्यांचे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ दिली. मात्र, नेत्याचा ठेकेदार पात्र झाल्यास इतर ठेकेदार न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने या वादावर पडदा टाकण्यासाठी निविदा रद्द न करता पाच मधील चार ठेकेदार अपात्र केले.
अग्निशमनदलाच्या केंद्रासाठी 5 निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, 4 जण अपात्र ठरले आहेत. त्यामुळे पुरेशी स्पर्धा होणार नसल्याने या निविदा रद्द न करता त्यांची फेरनिविदा काढण्यात येणार असून त्या आठ दिवसांच्या असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
– हर्षदा शिंदे, भवन विभाग प्रमुख