अभिव्यक्ती समृद्धीसाठी सोशल मीडिया पूरक : विनोद तावडे

पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे उद्‌घाटन

मुंबई  – सोशल मीडिया म्हणजे करमणूक, वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे चांगली मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडिया आपली अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी पूरक आहे, असे मत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.


शासकीय व्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य

सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी महापूर आला. या महापूराच्या बातम्या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांनी दाखविल्याच पण सोशल मीडियावर तर विविध मजकूर, बातम्या यांचा महापूर पाहायला मिळाला. त्यामुळेच या माध्यमाचे अस्तित्त्व आपण नाकारुन चालणार नाही. कारण हे माध्यम केवळ तरुणपिढीच्या मनोरंजनाचा विषय राहिला नसून, शासकीय व्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याचे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पहिले मराठी सोशल मीडिया संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन आज मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, समीर आठल्ये, मंगेश वाघ, प्रदीप लोखंडे आदी उपस्थित होते.

तावडे म्हणाले, माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियामुळे आज जागतिक स्तरावरील मराठी जन एकत्र बांधला गेला असून मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे. येणाऱ्या काळात मराठी भाषा विभागामार्फत प्रचलित साहित्यिक आणि सोशल मीडियावर लिहिणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पहिल्या सोशल मीडिया संमेलनासाठी राज्य शासन पाठिशी असून येणाऱ्या काळात हे माध्यम अधिक शक्तीशाली करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील.

मराठी सोशल मीडिया संमेलन आयोजित करणे ही काळाची गरज आहे. आज सोशल मीडियावर येणारे साहित्य याला साहित्य मानावे की नाही असा प्रश्न अनेकांना येतो. पण मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मी आपणास आश्वस्त करतो की सोशल मीडियावर लिहिला जाणारा मजकूर हा साहित्य प्रकारच आहे. आजची तरुणाई या माध्यमाला आपलेसे करुन या माध्यमात अधिक उत्तमपणे व्यक्त होत आहे.

दोन वर्षापूर्वी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विकिपिडीयासाठी एक पान लिहा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी या आवाहनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावर मांडलेले विचार, साहित्य आपण सर्वांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे. सोशल मीडियाच्या आवडीमुळे आजची तरुणाई पुन्हा वाचनाकडे, वर्तमानपत्रांकडे वळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)