पाकिस्तानात ‘ना स्वातंत्र्य, ना सुरक्षा’ – ग्रॅंट फ्लॉवर

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य कमी आणि असुरक्षितता अधिक आहे. यामुळे पाकिस्तानात राहणे हे नैराश्‍यवादात ढकलण्यासारखे आहे, असे वक्‍तव्य पाकिस्तान क्रिकेटचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि झिम्बाब्वेचे माजी सलामीवीर ग्रॅंट फ्लॉवर यांनी केले आहे.

पाकिस्तानमधील अशा अनेक समस्या त्या देशापासून लांब जाण्यास आपल्याला प्रवृत्त करतात, असेही ग्रॅंट फ्लावर यावेळी म्हणाले. झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू ग्रॅंट फ्लावरने 2014 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदाची धुरा आपल्या हाती घेतली होती. परंतु गेल्याच आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचं कॉंट्रॅक्‍ट न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ग्रॅंट फ्लॉवर यांनी हे विधान केले.

पाकिस्तानमध्ये राहत असताना सर्वांत नैराश्‍यवादी प्रसंग कोणता असा प्रश्‍न विचारला असता, त्यांनी सुरक्षा आणि स्वातंत्र्याचा अभाव, असे उत्तर त्वरीत दिले.

वर्ष 2017 मध्ये पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स चषकाचे विजेतेपद मिळवून देणे हे आपल्या प्रशिक्षण काळातील सर्वांत मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले.

पाकिस्तानातील कोणती गोष्ट पुन्हा आठवू इच्छित नाही, असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, माजी खेळाडूंकडून पाठीत खुपसलेला खंजीर आणि टीव्ही वाहिन्यांच्या मागे खेळण्यात येत असलेले राजकारण, या दोन गोष्टी कधीच आठवू इच्छित नाही, असे ते म्हणाले. त्यांनी बांगलादेशच्या प्रशिक्षकपदासाठी ही अर्ज केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.