मुंबई :- भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या गुडघ्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता येत्या काळात लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन यशस्वी पुनरागमन करणार आहे, असा निर्धार विनेशने व्यक्त केला आहे.
गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिने यंदाच्या मोसमातील आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंमध्ये विनेशचाही समावेश होता. चीनमधील हॅंगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला थेट प्रवेश मिळाला होता. विनेश याच स्पर्धेपूर्वीच्या सरावादरम्यान जखमी झाली होती.
विनेशने सोशल मीडियावर तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. मी अद्याप फिट नसून त्यासाठी मला थोडा कालावधी गरजेचा आहे. माझी देवावर श्रद्धा आहे. लवकरच मी थाटात पुनरागमन करणार आहे, असे विनेशने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, जे मी 2018 साली जकार्ता येथे सत्यात उतरवले होते. यावेळी मात्र दुखापतीमुळे माझ्या याच स्वप्नाला धक्का बसला आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे यासाठी मी माझे मत संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना पदक मिळवण्यासाठी मनापासून शुभेछा, असेही विनेशने सांगितले आहे.