विकास दुबे चकमक : ‘पोलिसांचे खच्चीकरण करणारी वक्तव्ये करू नये’

मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. यावरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर चकमकीचे समर्थन करत नाही तरी पोलिसांचे खच्चीकरण करणारी वक्तव्ये केली जाऊ नयेत, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, हा उत्तर प्रदेश अथवा योगी आदित्यनाथ यांचा प्रश्न नाही. तर देशाच्या कोणत्याही राज्यात असे झाले असते तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेते. जे झाले त्याचे राजकारण होता कामा नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचे कधी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही.

तसेच विकास दुबेसारखी जी लोकं निर्माण केली जातात ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचं राजकारण होणं धोकादायक आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.