पुणे – राज्यात टीईटी गैरप्रकारात एकूण ९ हजार ५३७ उमेदवारांचा समावेश आहे. परंतु, यातील काही उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी २०१८ व २०१९ मध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत सायबर पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने टीईटी २०१९ मधील गैरप्रकारामध्ये ७ हजार ८७४ परीक्षार्थी व २०१८ मधील गैरप्रकारामध्ये १६६३ परीक्षार्थी असे एकूण ९ हजार ५३७ परीक्षार्थी समाविष्ट आहेत. या सर्व परीक्षार्थ्यांची परीक्षेतील संपादनूक रद्द करण्यात आली आहे.
त्यांना यापुढील टीईटी परीक्षांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. परंतु, काही परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रकि्येमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरुन समाविष्ट झाले आहेत. त्यापैकी काही उमेदवारांची या भरती प्रक्रियेत शिक्षक म्हणून निवड झाली आहे, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उमेदवारांना चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये, असे परिषदेने पोलिसांना कळविले होते. तथापि, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांची वस्तुस्थिती पाहून नियमानुसार आपल्या स्तरावर चारित्र्य पडताळणीची कार्यवाही करावी, असेही राज्य परीक्षा परिषदेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.