पुणे – पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढू लागतो. मागील दोन आठवड्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचून डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सोसायटीसह परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. उत्पतीची ठिकाणे नष्ट करावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त (दि. १६) निमित्ताने जिल्हा हिवताप विभागाकडून जनजागृती केली जात आहे, तसेच या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांसह आवाहनही केले जात आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. त्याची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणुकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करून भरावे. घराभोवतीचा परिसर स्वच्छ राहील, याची काळजी घ्यावी. त्यामुळे डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण कमी होईल.
काय घ्यावी काळजी..
- डासांच्या उत्पत्तीची साधने नष्ट करावा.
- डासोत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडावेत.
- पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे.
- घरातील कूलर, फ्रीजचा डीप पॅन नियमित स्वच्छ ठेवावा.
- गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे, डबकी बुजवावीत.
- अंगभर कपडे घालावेत.
- झोपताना मच्छरदानी, डास प्रतिबंधक साधने वापरावी.
डेंग्यूच्या आजाराची लक्षणे
- तीव्र डोकेदुखी
- डोळ्यांच्या खोबणीत वेदना
- सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे
- भूक मंदावणे, उलट्या होणे
- तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रित काळसर संडास होणे
“आपल्या परिसरातील पाण्याची डबकी नष्ट करावीत. आजाराची लक्षणे दिसताच अंगावर दुखणे न काढता, तात्काळ प्राथमिक, तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. डेंग्यूची तपासणी करावी आणि आराम करावा.” – डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक – आरोग्य विभाग, पुणे