Vijay Wadettiwar Ghosalkar Firing : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला आहे, तर गोळीबार करणाऱ्या मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून स्वतःचे आयुष्य संपवल्याची माहिती उघड झाली आहे. एकंदरीतच या सगळ्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.
दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर टीका केली. यात त्यांनी ‘ फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधी वर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ?‘ असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी, ‘शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे.’
हेही वाचा – तरुण नेता गमावला; उद्धव ठाकरे सपत्नीक घोसाळकर कुटुंबाच्या भेटीला…
‘एकामागून एक अशा गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का ? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे.
तसेच आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे, “लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अश्या बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे.
राज्यात मुख्यमंत्री, ‘उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का? ‘ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.’