1. सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान राडा
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला. आज सकाळी सत्ताधारी पक्षाचे आमदार पायऱ्यांवर विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी विरोधकही त्याठिकाणी आल्यानंतर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. आक्रमक झालेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदारांनी एकमेकांच्या अंगावर जात शिवीगाळ केल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
2. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे – भरत गोगावले यांचा विरोधकांना इशारा
विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेत, ‘ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार? आम्हीच त्यांना धक्क्काबुक्की केली,’ अशी कबुली दिली. ‘आम्ही कोणाला पाय लावत नाही, पाय लागला तर नमस्कार करतो, पण कोणी आम्हाला पाय लावत असेल तर शिंगावर घेतो आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आमच्या नादाला लागू नका’ असा इशाराही गोगावले यांनी विरोधकांना दिला.
3. तुमच्या गटाच्या वाह्यात आमदारांना आवरा, अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
धक्काबुक्की प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ‘आंदोलन करत असताना शिंदे गटातील एका शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आई-बहिणींवरून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मिटकरी यांनी धक्काबुक्की प्रकरणानंतर, ‘तुमच्या गटाच्या वाह्यात आमदारांना आवरा’ अशी तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे तर शिंदे गटाच्या आमदारांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.
4. अमोल मिटकरींवर कारवाईची महेश शिंदेंची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात विधानभवन परिसरात आज झालेल्या धक्काबुक्कीनंतर महेश शिंदे यांनी मिटकरींवर कारवाईची मागणी केली आहे. मिटकरी लोकशाहीवादी नाहीत, त्यांचे विचार जहाल आणि चुकिचे आहेत असा आरोप करत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वाकडे कारवाईची मागणी केली.
5. पन्नास खोके एकदम ओक्केची घोषणा जिव्हारी लागल्याने हा प्रकार – अजित पवारांची सडकून टीका
धक्काबुक्की प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली आहे. पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. असेही पवार म्हणाले.
6. अशोक गहलोत यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाची संधी?
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाची संधी देऊ केली असल्याचे वृत्त आहे. त्या विषयी आज येथे पत्रकारांनी गेहलोत यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, अशी ऑफर देण्यात आल्याचे मला प्रसारमाध्यमांमधूनच समजले. मी पक्षाकडून दिली जाणारी जबाबदारी पूर्ण करण्याचे काम करीत असतो. याखेरीज मला नेमके अजून काहीही कळलेले नाही. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला तर अशोक गहलोत यांनी हे पद सांभाळावे, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे.
7. कॉंग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैठकीत ठरणार अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या रविवारी होणार असून त्यात पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. दुपारी साडेतीन वाजल्यापासून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होणार आहे. ही माहिती पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
8. गुजरातमध्ये यंदा कॉंग्रेसला संधी – वेणुगोपाल
गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ऍन्टी इन्कबन्सीचा फटका सोसावा लागणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत असून त्यातून कॉंग्रेसला येथे सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार आहे असा दावा कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले राज्यातील लोक भाजप राजवटीला उबगले आहेत. कॉंग्रेस निरीक्षक अशोक गहलोत यांच्यासमवेत वेणुगोपाल यांनी निवडणूक तयारीची बैठक घेतली. तब्बल 12 तास चाललेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
9. 20 कोटी रुपयांची ऑफर – आम आदमी पक्ष फोडण्याचा भाजपचा प्रयत्न
भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस अंतर्गत आम आदमी पक्षाच्या ज्या चार आमदारांना धमकावले होते व त्यांना पैशाची ऑफरही दिली होती त्या आमदारांना आज पत्रकार परिषदेत सादर करून आम आदमी पक्षाने भाजपच्या या ऑपरेशनचा चांगलाच भंडाफोड केला. पक्ष फोडण्यासाठी भाजपने या आमदारांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ती ऑफर न स्वीकारल्यास त्यांना सीबीआय आणि ईडीच्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली होती, असा दावा या चार आमदारांनी केला आहे.
10. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचेच पारडे जड – आफ्रिदी
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघच संभाव्य विजेता आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही त्यांचेच पारडे जड राहील, असे मत पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने व्यक्त केले आहे. आशिया कप येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे.