मुंबई – शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फुट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. सध्या या राजकीय घडामोडीवर विरोधक टीका करताना दिसतात. यातच आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे वेगळ्यापद्धतीने सरकारवर निशाणा साधला आहे.
सचिन सावंत यांनी ‘अंदाज अपना अपना’ सिनेमातला एका प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात आमिर खान, सलमान खान आणि परेश रावल हे एकाच लुनावरुन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान आणि सलमान खान म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट असे दाखवण्यात आले आहे. तर परेश रावल म्हणजे भाजप दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, आमिर खान आणि सलमान खान लुनावर बसलेले असतात पण परेश रावलला जागाच नसते. मागे बसा, पुढे बसा असं दोघे सांगतात. शेवटी परेश रावल चिडतो आणि दोघांना खाली उतरवतो. मग स्वतः लुनावर बसतो आणि लुना सुरु करतो.
शिंदे+ फडणवीस + अजितदादा यांच्या “तीन तिगाडा काम बिगाडा” सरकारची अवस्था …..
आणि भाजपा ची गरज सरल्यानंतरची शिंदे गट व अजित पवार गटाची अवस्था …… 😂😂 pic.twitter.com/ZZJf4BaSvA
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 18, 2023
त्यावेळी सलमान आणि आमिर हे मागच्या सीटवर कसेबसे बसतात. मात्र परेश रावल लुना घेऊन निघून जातो आणि हे दोघे मागेच राहतात. आत्ताच्या भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट या सरकारची अवस्था अशीच असल्याचे सचिन सावंत यांनी म्हंटले आहे. सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले की, ‘शिंदे+ फडणवीस + अजितदादा यांच्या “तीन तिगाडा काम बिगाडा” सरकारची अवस्था …..आणि भाजपची गरज सरल्यानंतरची शिंदे गट व अजित पवार गटाची अवस्था ….’ सचिन सावंत यांचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आले असून यावर आता सत्ताधारी काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.