नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पूंछ-जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी एका लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात वाहनांना भीषण आग लागून पाच जवानांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. संबंधित वाहनातून रॉकेलची वाहतूक केली जात होती, त्यामुळे चालत्या वाहनाला आग लागून ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लष्कराचे वाहन पूंछ जिल्ह्यातील भिंबर येथून संगिओतकडे जात होते. यावेळी पूंछ-जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर लष्कराच्या वाहनाला आग लागली, या आगीत पाच जवानांचा होरपळून मृत्यू झाला.
The troops were part of a convoy that came under attack by terrorists in J&K’s Poonch: Army sources https://t.co/UG2QOjbzJk
— ANI (@ANI) April 20, 2023
पूंछ जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धुक्याचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा वापर केल्यामुळे गाडीला आग लागली, अशी माहिती नॉर्दन कमांडने दिली.
“या दुर्दैवी घटनेत दहशतवादविरोधी कारवायांसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या पाच जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. संबंधित जवानाला तत्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत,” असेही नॉर्दन कमांडने सांगितले. या हल्ल्याप्रकरणी लष्कराकडून पुढील कारवाई केली जात आहे.