संगमनेर – पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मोगलपुऱ्यात घातलेल्या छाप्यात सुमारे दोन टन गोवंशाच्या मांसासह 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील चौघे पसार झाले आहेत. ही कारवाई आज पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास देवीगल्ली नजीकच्या मोगलपुऱ्यात करण्यात आली. आय्युब तांबोळी या इसमाच्या चाळीत गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
पोलीस पथकाने मोगलपुऱ्यातील “त्या’ चाळीत छापा टाकला. दोन वाहनांच्या चालकांसह कत्तलखान्याचे दोघे चालक अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले. तर यावेळी पत्र्याच्या खोलीत कत्तल करणारे दोघे मात्र पोलिसांच्या हाती सापडले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 700 किलो गोवंशाचे कापलेले मांस, पाच लाख रुपये किंमतीचा पिकअप (क्र.एम.एच.12/एल.टी.4371), 1 लाख 20 हजार किंमतीची मारुती ओमनी (क्र.एम.एच.12/एफ.डी.1446) असा 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि एक कुर्हाड, एक कानस, कोयता व 15 इंच लांबीचा टोकदार चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी आज पहाटे चारच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यावरुन पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आसिफ इक्बाल कुरेशी (वय 32) व एक अल्पवयीन (दोघेही रा. हल्ली मदिनानगर, मूळ मालेगाव, जि.नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यातील अल्पवयीन आरोपीला नगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
कत्तलखान्याचे चालक सोनू रफीक कुरेशी, सालीम साठम कुरेशी व पिकअप आणि ओमनी कारचे दोघे अज्ञात चालक असे चौघे पसार झाले आहेत. पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व अमृत आढाव यांनी ही कारवाई केली.