अहमदाबाद – गुजरातच्या सर्व २६ जागांवर येत्या ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण २६६ उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार भारतीय जनता पार्टीच्या पूनम माडम ( Poonam Madam) या राज्यातील सगळ्यांत श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४७ कोटींची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार रेखा चौधरी या सगळ्यांत गरिब उमेदवार असून त्यांची केवळ दोन हजारांची संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
एडिआर या संस्थेच्या म्हणण्यानुसार राज्यातील ६८ उमेदवार म्हणजे २६ टक्के उमेदवार करोडपती आहेत. अर्थात त्यांची संपत्ती १ कोटींपेक्षा जास्त आहे. भारतीय जनता पार्टीचे सूरत येथील उमेदवार मुकेश दलाल यांना अगोदरच बिनविरोध घोषित करण्यात आले आहे. त्यांची संपत्ती १७ कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी १४७ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. यात ८७ कोटींची स्थावर आणि ६० कोटींची जंगम मालमत्ता आहे.
एडिआरच्या म्हणण्यानुसार भाजपच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती १५ कोटी तर कॉंग्रेसच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती ६ कोटींची आहे. राज्यातील १५ सगळ्यांत श्रीमंत उमेदवारांपैकी ८ भाजपचे तर ७ कॉंग्रेसचे आहेत. भाजपचे २४ तर कॉंग्रेसचे २१ करोडपती उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेसचे अहमदाबाद येथील उमेदवार भारत मकवाना हे पक्षाचे राज्यातील सगळ्यांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २५ कोटींची असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील नवसारी येथून रिंगणात आहेत. ते ३९ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियही गुजरातमधून रिंगणात आहेत. ते ७ कोटींचे मालक आहेत. तर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले केंद्रीय मंत्री परषोत्तम रूपाला १७ कोटींचे मालक आहेत.