गुवाहाटी – कर्नाटकातील विद्यमान खासदार आणि एनडीए आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केल्यानंतर आज गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांनी प्रियंकांवर पलटवार केला आहे. (Amit Shah reaction on prajwal revanna sex scandal case)
कर्नाटकात कॉंग्रेसचेच सरकार आहे मग त्यांनी या प्रकरणात कारवाई का केली नाही? असा सवाल अमित शहा यांनी केला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही मातृशक्तीच्या बरोबर आहोत असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तथापि प्रज्वल रेवण्णा यांनी हे प्रकरण चार-पाच वर्षांचे जुने प्रकरण आहे असा दावा केल्याने अमित शहा यांच्या आरोपातील हवा निघून गेली आहे. कारण कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार सुमारे वर्षभरापुर्वीच सत्तेवर आले आहे असे कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपचेच कर्नाटकात सरकार असल्यापासून रेवण्णा यांचे हे उद्योग सुरू होते असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे आणि तो राज्य सरकारच्या हातात येतो, त्यामुळे कॉंग्रेस सरकारने या प्रकरणात या आधीच कारवाई करायला हवी होती असे अमित शहा यांनी म्हटले आहे.