Ajit Pawar on Dattatray Bharne : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनेकदा अजित पवार यांच्या वक्तव्यांमुळे वाद देखील निर्माण झाले आहेत. अजित पवार यांनी मात्र या सर्वांची फिकीर करत न बसता आपली वक्तृत्व शैली कायम ठेवली आहे. अशातच आता अजित पवार यांचे आणखी एक वक्तव्य चर्चेत आहे. निंबुत (ता. बारामती) येथे रविवारी एका उद्घाटन कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले अजित पवार?
या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते. अजित पवार यांनी यावेळी संबोधित करताना राज्यमंत्री भरणे यांना उद्देशून, “संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा निरा-बारामती रस्ता महत्त्वाचा आहे. बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे येथे उपस्थित आहेत. दत्तामामा तुम्ही नुसता इंदापूर तालुक्याकडे लक्ष देऊ नका. मलादेखील या बाबाला विनंती करावी लागते, आमच्या तालुक्यातील रस्त्यांनाही निधी द्या.” असं म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, “बांधकाम खात्याच्या चाव्या जरी दत्तामामाच्या हातात असल्या तरी वित्तमंत्री म्हणून त्यांच्या निधीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच निधी दिला नाही तर तो काय घंटा करणार”
त्यांच्या या अनपेक्षित वक्तव्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चांगलेच गोंधळले. तर सभागृहात देखील हास्यकल्लोळ उडाला.