नवी दिल्ली – एसएस राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR रिलीज झाला आहे. बाहुबली फ्रँचायझीनंतर राजामौली यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. या चित्रपटात रामचरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्टसारखे मोठे स्टार्स आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली.
रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 120 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आणि यासह हा चित्रपट सर्वाधिक ओपनर बनला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीनेही बॉक्स ऑफिसवर तब्बल 20 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 25 ते 28 कोटींचा व्यवसाय केला. वीकेंडमुळे चित्रपटाच्या बिझनेसमध्ये कमालीची उसळी आली आहे.
मेगा पॉवर स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची RRR मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जगभरातून प्रशंसा केली जात आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम भाषांमध्येही डब करण्यात आला आहे. RRR चित्रपट देशभरात 5000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली, त्यामुळे वीकेंडला आणि येत्या काही दिवसांत हा चित्रपट कमाईच्या बाबतीत मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो, असे म्हणता येईल.