वडगाव – आगामी काळात मावळ तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विजय नक्की आहे. आप आपल्यात संघर्ष न करता, कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त नीट रहा, असा सल्ला आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला.
वडगाव मावळ येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभासाठी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेळके म्हणाले की, मावळातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी आपले उमेदवार निवडून आले असते. मात्र, काही ठिकाणी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यामुळे दोन ग्रामपंचायतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. कार्यकर्त्यांनी देखील पक्ष श्रेष्टींच्या सूचना ऐकल्या पाहिजेत.
सहाशे कोटी तरी आणून दाखवा
मावळ तालुक्यातील मंजूर कामे तसेच सुरू असलेल्या कामांना दिलेल्या स्थगितीवरून आमदार शेळके यांनी विरोधकांना विकास कामात राजकारण करून निधी आडवू नका सांगितले. तसेच मी मागील अडीच वर्षामध्ये विकास कामासाठी 1200 कोटी आणले आता तर राज्यामध्ये तुमचे सरकार आहे मावळातील विकासासाठी किमान सहाशे कोटी तरी आणा. तसेच मावळ तालुक्यातील कामांना आम्ही 47 कोटी आणले अशी जाहिरात सुरू आहे. हा निधी आणला असेल तर तो दाखवावा. तसेच येणाऱ्या नवीन वर्षात चौथे वर्ष सुरू होत असून “वर्षे चौथे शब्दपूर्तीचे” या अंतर्गत गावागावात जो काही शब्द दिला होता पूर्ण करणार, सत्ता असो किंवा नसो, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
गद्दारी करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यामुळे आपले काही सदस्य व सरपंचांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच खरेदी विक्री संघ व खादीग्राम उद्योग निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार आहे. 50 कार्यकर्ते गेल्याने काही फरक पडत नाही. ते गेल्याने पक्षाला फायदा होऊन एक दोन हजार कार्यकर्ते जोडले जातील. त्यामुळे पक्षाची गद्दारी करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे आमदार शेळके यांनी संगितले.