व्यवहार आजपासून : भुसार बाजारात अत्यल्प गर्दी
पुणे – मार्केट यार्डातील भाजीपाला आणि फळ विभाग मंगळवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भाजीपाला पुरवठा पुन्हा सुरळीत होऊन किरकोळ बाजारात भाज्यांचे वाढलेले भाव कमी होतील. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सोमवारपासून सुरू झालेल्या गूळ-भुसार विभागात तुलनेने गर्दी कमी होती.
सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत भुसार विभाग सुरू होता. दरम्यान, सोमवारी 116 गाड्यांची आवक झाल्याची माहिती भुसार विभागप्रमुख नितीन रासकर यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात सुमारे 50 ते 60 गाड्या आवक होत होती. जी आता सुरळीत होणार आहे.
वेळ वाढवून द्या : व्यापारी
भुसार बाजारातील व्यापाऱ्याची संघटना दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली. सकाळी 8 ते दुपारी 12 ही वेळ व्यवहारासाठी अपुरी आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत व्यापारास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी “हा वेळ लॉकडाऊन काळातील आहे. नंतर वेळ बदलला जाईल. मी पोलीस आयुक्तांशी चर्चा करतो,’ असे आयुक्तांनी सांगितले. त्यावेळी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा आणि माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रवीण चोरबेले यावेळी उपस्थित होते.