वॉशिंग्टन – “कोविड-19′ महामारी निर्माण करणारा करोना विषाणू डासांच्या चावण्यामुळे पसरत नाही, असे स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केले आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मताला पुष्टी मिळते. डब्ल्यूएचओने मागेच सांगितले होते की, मानवाला डास चावल्यामुळे करोनाचा संसर्ग होत नाही.
याबाबत तयार करण्यात आलेल्या अहवालात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर आकडे एकत्रित करण्यात आले आहेत. ज्याद्वारे डास चावल्यामुळे करोनाचा प्रसार होण्याच्या क्षमतेला तपासले जाऊ शकते. अमेरिकेतील कंसास स्टेट युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ स्टिफन हिग्स यांनी याबाबत सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट सांगितले होते की, डासांमुळे हा संसर्ग पसरत नाही. आम्ही जे संशोधन केले आहे त्यात डब्ल्यूएचओच्या मताला पुष्टी देण्यासाठी प्रथमच अधिकृत आकडे समोर आणले आहेत.
या अहवालानुसार डासांच्या तीन सामान्य प्रजातींमध्ये हा विषाणू प्रजनन करण्यास असमर्थ आहे. यामुळे हा विषाणू डासांपासून मानवात पसरण्याची शक्यता शून्य होते. शास्त्रज्ञांनुसार जर एखाद्या करोनाबाधित व्यक्तीला डास चावला तर त्या बाधित व्यक्तीच्या रक्तातील विषाणू त्या डासाच्या अंगात जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे तोच डास इतर व्यक्तीला चावला असता करोनाचा प्रसार होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.