पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छूक असलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांची गुरुवारी (दि.28) वाकड येथील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जाधव यांच्या माध्यमातून त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत वसंत मोरे हे जाधव यांच्यासमवेत उद्या (दि.29) प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेणार आहेत.
वसंत मोरे हे काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छूक होते. मात्र, याठिकाणी आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने मोरेंच्या मनसुब्यांवर पाणी पडले.
मात्र, त्यांनंतरही त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे हे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. तर अनिल जाधव यांनी त्यांना वंचितकडून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल जाधव व वसंत मोरे हे उद्या मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे प्रकाश झोतात आलेले मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे वसंत मोरे हे वंचित की की मराठा मोर्चाकडून निवडणूक लढविणार? याबाबतचे चित्र स्पष्ट होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे.