नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने यावेळी अनेक हाय प्रोफाइल नेत्यांचे तिकिट कापले आहे. त्यात गांधी- नेहरू कुटुंबाशी संबंधित आणि भाजपचे खासदार असलेल्या वरूण गांधी यांचाही समावेश आहे. वरूण यांच्या पिलीभीत मतदार संघातून भाजपकडून दुसरा उमेदवार देण्यात आल्याने वरूण यांचा पत्ता कट झाला आहे.
अशातच आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी वरूण यांना कॉंग्रेसमध्ये दाखल होण्याचा प्रस्ताव दिला आहे. देशातील सगळ्यांत जुन्या पक्षात सहभागी होण्यासाठी वरूण यांचे स्वागत आहे असे चौधरी यांनी म्हटले आहे. वरूण हे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे चुलत बंधु तर सोनिया गांधी यांचे पुतणे आहेत.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चौधरी म्हणाले की गांधी कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वरूण यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे वरूण यांनी आता कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले पाहिजे. ते उच्चशिक्षण घेतलेले आणि स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत. त्यांनी पक्षात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. ते जर कॉंग्रेसमध्ये आलेत तर आम्हाला त्याचा आनंदच आहे.
भाजपने उत्तर प्रदेशातील अन्य उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली होती. त्यात पिलीभीत येथून ब्राह्मण चेहरा असलेले जीतीन प्रसाद यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. जीतीन प्रसाद हेही मुळचे कॉंग्रेसचेच नेते आहेत. त्यांचे वडीलही उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे एक बडे प्रस्थ होते.
ते रिंगणात उतरल्यामुळे तुम्हाला तिकिट नाही असा थेट संदेश भाजपकडून वरूण यांना गेला आहे. समाजवादी पक्षही वरूण यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होता. त्यांची दारेही वरूण यांच्यासाठी खुली आहेत. आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वरूण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जाते आहे.