जळोची : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे इंदापूर येथे सभा घेणार आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे बारामती लोकसभा मतदारसंघात येणार असतील तर अतिथी देवो भव… त्यांचे स्वागतच असेल.. मात्र माझी माफक अपेक्षा आहे की, त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. तसेच या भागात दुष्काळाची परिस्थिती असल्याने हा प्रश्न सोडवावा. (Baramati Lok Sabha Election 2024)
नवीन पिढीच्या नोकरीचा प्रश्न सोडवावा, महागाई कमी करावी, हमीभाव द्यावा, जागा वाटप संदर्भात वारंवार दिल्लीवारी करतात तर एकदा तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीला जाऊन प्रश्न सोडवा.. अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली. दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांना इशारा दिल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेचा शब्द देऊन त्यांची मदत घेणार का? असा प्रश्न केला असता खासदार सुळे म्हणाल्या की, गेली पंधरा वर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. हर्षवर्धन भाऊ, दत्तात्रेय मामा यांनी निवडणुकीत मला मदत केली आहे. ती मदत मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आता जो दोघांनी निर्णय घेतला आहे तो लोकशाही पद्धतीने त्यांनी घेतला आहे. याआधी त्यांनी मला मदत केली आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. विधानसभेला इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार ,असे सुळे म्हणाल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असून, महादेव जानकर बारामतीतून उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता सुळे म्हणाल्या की, अशी चर्चा माझ्यापर्यंत तरी आली नाही. बारामती मतदारसंघातील दुष्काळ, छावण्यांची गरज, पाण्याची परिस्थिती, टँकरची मागणी हे प्रश्न गंभीर होत चालले आहेत, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.