नवी दिल्ली – पंजाबच्या लुधियाना येथील खासदार आणि माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू यांनी कॉंग्रेस पक्षाला हादरा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. बिट्टू हे कॉंग्रेसचे पंजाबमधील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठे बळ मिळाल्याचे मानले जाते आहे.
तीन वेळा खासदार राहीलेल्या बिट्टू यांना भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पक्षात प्रवेश देत प्रक्रिया पूर्ण केली. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये ते लुधियानातून मोठ्या फरकाने विजयी झाले होते.
तत्पूर्वी २००९ मध्ये बिट्टू आनंदपूर साहिब मतदार संघातून लोकसभेवर गेले होते. २०२१ मध्ये काही काळासाठी कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
विनोद तावडे यांनी बिट्टू यांना भाजपचे प्राथमिक सदस्यत्व देताना त्यांची प्रशंसा केली. रवनीत सिंग भाजपसोबत आल्यामुळे पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत त्याचा भाजपला लाभ होऊ शकतो.