वडगाव मावळ – जातीचा दाखला काढण्यासाठी आदीवासी बांधवांना शासकीय कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. त्यांचा हा त्रास दूर करण्यसाठी आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठाणच्यावतीने जातीचे दाखले काढून देण्याच्या अभियानाचा शुभारंभ नुकताच झाला.
वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज भूमीहिन व शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते, अशा कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो.
दाखला काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजातील बांधवांना “मदत नव्हे कर्तव्य’ या सामाजिक बांधिलकीतून जातीचे दाखले काढून देण्यासाठी सेवाभावी अभियान राबविण्यात येत आहे. वडगावमधील दिडशे कुटुंबीयांचे जातीचे दाखले काढून देण्याच्या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. येत्या दिड महिन्यात सर्व कुटुंबियांना जात प्रमाणपत्र मोफत काढून दिले जाणार असल्याचे अबोली ढोरे यांनी सांगितले.
हॉस्टेलची उभारणी करणार – मयुर ढोरे
आदीवासी समाजातील मुलांसाठी वडगावमध्ये राहण्यासाठी सोय नाही. त्यामुळे येत्या काळात ठाकर, आदिवासी व कातकरी समाजातील लहान मुलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.