लखनौ – देशातील पाच राज्यांत पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून त्यातील उत्तर प्रदेश हे सगळ्यांत महत्वाचे राज्य आहे. दिल्लीतील पुढच्या सरकारचा मार्ग उत्तर प्रदेशातूनच प्रशस्त होणार असल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही कामाला लागला आहे.
संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनौचा दौरा करणार आहेत. तर भैयाजी जोशी हे राम मंदिर प्रोजेक्टचे केअर टेकर असणार आहेत. असे वृत्त एका हिंदी वाहिनीने दिले आहे.
पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. 15 वर्षाच्या राजकीय वनवासानंतर भाजप उत्तर प्रदेशात सत्तेत आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा यूपी सर करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे.
उत्तर प्रदेशातील सत्ता भाजपच्या हातून जाऊ नये म्हणून संघही कामाला लागला आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कारणाने उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वाचे असल्याने संघ आणि भाजपला यूपीची सत्ता हातून जाऊ द्यायची नाही, त्यामुळे या दोन्ही संघटनांनी कंबर कसली आहे.
2022मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुका झाल्यानंतर 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. लोकसभेत चांगलं यश मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश जिंकणं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य असल्याने भाजपने उत्तर प्रदेशसाठी मोर्चबांधणी सुरू केली आहे. शिवाय 2025मध्ये संघाचं शताब्दी वर्ष आहे.
त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असणं संघ आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच संघाचे नवे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे नागपूर मुख्यालयात राहण्याऐवजी लखनऊमध्ये राहून मिशन यूपीवर जोर देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.