नवी दिल्ली – इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधण्यासाठी विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी शनिवारी अनोखे पाऊल उचलले. विरोधकांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
देशात 1973 मध्ये पेट्रोलची किंमत 7 पैशांनी वाढली. त्याचा निषेध करण्यासाठी त्यावेळी जनसंघाचे नेते असणारे वाजपेयी चक्क बैलगाडीतून संसद भवनात पोहोचले. तो व्हिडिओ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी शेअर केला.
दुर्मिळ फुटेज अशी टिप्पणीही थरूर यांनी ट्विटरवरून केली. वाजपेयींचा व्हिडिओ तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन आणि आपचे आमदार सोमनाथ भारती यांनीही शेअर केला. मागील दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोल दराने शंभरी ओलांडली आहे.
राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांत तर डिझेलनेही तो टप्पा पार केला आहे. इंधन दरांच्या भडक्यावरून विरोधक सातत्याने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. इंधन दरवाढीच्या निषेधासाठी देशव्यापी निदर्शनांची तयारी कॉंग्रेसने केली आहे.