नगर -बॅंकेच्या कारभाराविषयी सामान्य सभासदांचे प्रतिनिधी म्हणून शंका उपस्थित करणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे विरोधक म्हणून आमचे कर्तव्य आहेच. विरोध करतानाही आमची भाषा सभ्यच असते. सत्ताधारी संचालक मात्र प्रश्नांचे उत्तर टाळण्यासाठी असभ्य भाषेत प्रत्युत्तरे देतात. शंका विचारणाऱ्यांवर वैयक्तिक टीका करतात, त्यामुळे निवडून दिलेले संचालक हे शिक्षकच आहेत का? अशी शंका येते, अशी टीका गुरुकुल मंडळातर्फे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी केली.
किमान आपण शिक्षकी पेशात आहोत, याचे भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. गुरुमाऊलीच्या रोहोकले गटाने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी कोट्यावधीची तरतूद केली. ही रक्कम सध्याच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांना देताना त्यातील काही वाटा घेतल्याची सभासदांमध्ये कुजबुज आहे. त्यावरुन जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली. त्याचे उत्तर देताना मात्र संचालकांची बौध्दीक पातळी घसरल्याचे दिसते, अशी टीका गुरुकुल मंडळातर्फे करण्यात आली आहे.
बॅंक शताब्दीसाठी रोहोकले गटाने 1 कोटीची तरतूद केली, त्या रकमेचा वापर होताना मात्र रोहोकले गट बाजूला राहिल्याने तगमग झाली. मुळात इतक्या मोठ्या रकमेची तरतूद करणे खरोखर गरजेचे होते का ? यामध्ये गुरुमाऊलीचे दोन्ही गट दोषी आहेत, असा दावाही त्यांनी केला. बॅंक शताब्दीच्या 1 कोटीच्या विल्हेवाटीचा हिशोब पारदर्शकपणे सभासदांसमोर आला पाहिजे. शिवाय कर्जावरील व्याजदरात किमान 1 टक्के कपात केली पाहिजे. अन्यथा सत्ताधाऱ्यांच्याविरुद्ध तीव्र अंदोलन छेडले जाईल, असा इशाराही गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, कार्याध्यक्ष सुकदेव मोहिते, सरचिटणीस शिवाजी रायकर, यांसह बाळासाहेब खेडकर, अशोक कानडे, जालिंदर गोरे, अशोक आगळे, मधुकर मैड, दशरथ पवार, उत्तम गायकवाड, ज्ञानेश्वर बोडखे, सोमनाथ ऐलमामे, अनिल ओहोळ, शरद धलपे, बबन बनकर, सचिन झावरे, सुनिल घाडगे, संतोष डमाळे, सतिश अंधारे, सिताराम गव्हाणे, विलास गोरे यांनी दिला आहे.