कोपरगाव – कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरला करोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर कोपरगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करून त्यांना करोनामुक्त करण्यात कोपरगावच्या वैद्यकीय पथकाला यश आले आहे.
या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या बाधित महिला डॉक्टर या पहिल्याच रुग्ण होत्या. त्यांना करोना संसर्गजन्य आजारातून मुक्त करून घरी सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. 2 मे रोजी शहरातील एका महिला डॉक्टरला करोनाची बाधा झाल्याची माहिती समजताच करोनामुक्त असलेल्या कोपरगाव तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढून तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
बाधित महिलेला कोपरगाव कोविड केअर सेंटरमध्येच उपचार करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. एका महाविद्यालयात सुरु केलेल्या या सेंटरमध्ये बाधित रुग्ण म्हणून उपचार घेणारी ही महिला पहिलीच रुग्ण असल्याने वैद्यकीय विभागापुढे मोठे आव्हान होते. मात्र कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, वैशाली बडदे यांनी योग्य उपचार पध्दतीचा आधुनिक प्रकार वापरून केवळ 10 दिवसात बाधित रुग्ण करोनामुक्त केला. सध्या या सेंटरमध्ये 14 वर्षाची एक मुलगी करोनाबाधित आहे.
तिच्यावरही योग्य उपचार सुरू असुन तीची आरोग्यस्थिती उत्तम असल्याने येत्या काही दिवसात ती करोनामुक्त होवून घरी जाणार आहे, अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली आहे. यावेळी डॉ. फुलसौंदर म्हणाले, या कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित व संशयीत रुग्णावर उपचार करण्यासाठी 6 डॉक्टर, 6 परिचारीका, आरोग्य सेवक, पालीकेचे सफाई कर्मचारी व इतर सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणेसह रुग्णवाहिका, 24 तास वैद्यकीय सेवा देत होते. रुग्णावरती आय.सी.एम.आर.ने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे औषधोपचार देवून दिवसातून तीनवेळा विविध तपासण्या करुन योग्य आहार व औषधामुळे हे रुग्ण करोनामुक्त होण्यास मदत झाली.
करोनामुक्त महिला डॉक्टर घरी सोडताना तहसीलदार योगेश चंद्रे, मुध्याधिकारी प्रशांत सरोदे, डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाटे, डॉ. वैशाली बडदे, डॉ. विधाटे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरीक्षक नागरे, आरोग्य, पालीका, महसूल विभागाचे कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून सन्मान करत आदरपुर्वक निरोप दिला. बाधित महिला डॉक्टर हे सर्व पाहुन भारावल्या व त्यांनी पानावलेल्या डोळ्यांनी सर्वांचे आभार मानले.