कोलोंबो – श्रीलंकेबाबतचा अमेरिकेचा दृष्टिकोन हा शिकारी चीनच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केले आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान तेथील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर श्रीलंकेचे सार्वभौमत्व अणि सुरक्षिततेबाबत अमेरिका कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री दिनेश गुणवर्देना यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर घेतलेल्या संयुक्त परिषदेमध्ये ते बोलत होते. ही चर्चा लोकशाही मूल्यांवर झाली असल्याचे अमेरिकेच्या मुत्सद्यांनी सांगितले.
जागतिक व्यासपिठावर समर्थ सार्वभौम श्रीलंका हा सकारात्मक भागीदार आहे. श्रीलंका हा भारत-प्रशांत क्षेत्रासाठीच्या स्वातंत्र्यासाठीचा दीपस्तंभ असू शकतो. चीनची कम्युनिस्ट पार्टी ही शिकाऱ्यासारखी आहे. मात्र अमेरिकेचा दृष्टिकोन मित्रासारखा आहे, असे पॉम्पेओ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
श्रीलंकेला भेट देणारे पॉम्पेओ हे ट्रम्प प्रशासनातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. श्रीलंका आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध दृढ होण्यासाठी लोकशाहीबाबत आणि लोकशाही निवडणूकांबाबत समान मते आहेत, असे पॉम्पेओ म्हणाले.
श्रीलंकेमध्ये चीनच्या हालचाली वाढत आहेत. मात्र अमेरिकेच्या उद्योगांचे स्वरुप चीनपेक्षा अधिक व्यापक आहे असे सांगून पॉम्पेओ यांनी सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यावरही भर दिला.
अमेरिकेतील कंपन्या जास्त विश्वासार्ह, कायद्याला अधिक बांधील आणि पारदर्शक आहेत. अमेरिकेला लोकशाही आणि पूर्ण स्वतंत्र श्रीलंकेबरोबरचे संबंध अधिक वृद्धिंगत करायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. श्रीलंकेला अमेरिकेकडून दिल्या जात असलेल्या नाविक सहकार्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
गेल्या वर्षी ईस्टरच्या दिवशी भीषण बॉम्बहल्ला झलेल्या उत्तर कोलोंबोतील सेंट ऍन्टोनी चर्चलाही पॉम्पेओ यांनी भेट दिली. या बॉम्बस्फोटात अमेरिकेचे 5 नागरिकही ठार झाले होते.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे श्रीलंकेमध्ये स्वागत आहे. मात्र श्रीलंका या पुढच्या काळातही तटस्थ राहिल असे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री गुणवर्देना यांनी सांगितले.
चीनचा थयथयाट…
लहान आणि मध्यम आकाराच्या देशांना कोणती तरी एक बाजू घेण्यास भाग पाडणे ही अमेरिकेच्या सध्याच्या राजकीय नेत्यांची सवयच आहे, अशी प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेनबीन यांनी दिली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यातही पॉम्पेओ यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीवर केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
श्रीलंकेचे परराष्ट्र धोरण हे कोणत्याही विदेशाच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होण्याऐवजी नागरिकांच्या मर्जीनुसार आणि श्रीलंकेतील कायद्यांनुसार निश्चित होते, अशा आशयाचा लेख श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केला आहे, याची आठवणही वेनबीन यांनी करून दिली. श्रीलंका आणि चीनमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अन्य कोणाही व्यक्ती अथवा देशामुळे हे संबंध कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.