श्रीनगर – दहशतवाद्यांना वित्त पुरवठा केल्याच्या प्रकरणात एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मिरात आणि बंगळुरूमध्ये काही स्वयंसेवी संस्थांच्या दहा ठिकाणांवर छापे टाकले आहेत. जम्मू-काश्मिरातील फुटिरतावादी संघटनांच्या कार्यक्रमांना मदत केल्याच्या कारणावरून ही छापेमारी करण्यात आली.
या छाप्यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक सामग्री सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. त्यातून मदतीच्या संबंधातील सर्व माहिती मिळू शकणार आहे असा एनआयएचा दावा आहे.
ज्यांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले त्यात जम्मू-काश्मीर आघाडी ऑफ सिव्हिल सोसायटीचे खुर्रम परवेझ, त्याचा सहकारी परवेझ अहमद बुखारी, परवेझ अहमद मत्ता आणि बंगळुरू येथील स्वाती शेषाद्री आणि परवीना अहंगर यांचा समावेश आहे.
अथ्राऊत नावाची एक स्वयंसेवी संघटना आणि जीके ट्रस्ट यांच्याही िंठकाणांवर छापे टाकण्यात आले. या सर्वांच्या विरोधात 8 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संस्था व्यापारी आणि व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करून जम्मू-काश्मिरात चळवळी करणाऱ्या संस्थांना देणगी म्हणून देत होत्या.
प्रत्यक्षात हे दहशतवादी कारवायांना केलेले आर्थिक सहाय्य आहे, असे एनआयएचे म्हणणे आहे. या स्वयंसेवी संस्थांना अज्ञात ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आल्याचेही एनआयएचे म्हणणे आहे.