Air Pollution Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. सरकार अनेक खबरदारीच्या उपाययोजना करत आहे, पण तरीही फायदा होत नाही. दरम्यान, अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी म्हणाले की, वाढत्या वायू प्रदूषणामुळे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.’
एरिक गारसेटी म्हणाले की, दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीने त्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत, एक असा काळ होता जेव्हा संपूर्ण अमेरिकेत सर्वात खराब हवा असलेले शहर लॉस एंजेलिस होते. त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला बाहेर खेळण्यास मनाई केली होती. तसेच आज माझ्या मुलीला शाळेत सोडल्यानंतर तिच्या शिक्षकांनी तिला ताकीद दिली आहे.
दरम्यान, अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे भारतातील राजदूत यामुळे गारसेटी यांच्या वक्तव्यांना मोठं महत्त्व आपोआपच प्राप्त होतं. त्यांनीच आज एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिल्लीबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
दिल्लीची हवा गुदमरण्याच्या दिशेने..
राजधानीत वाऱ्याचा वेग कमी झाल्याने हवा गुदमरण्याच्या दिशेने वळत आहे. गुरुवारी पुन्हा एकदा एनसीआरमधील दिल्लीची हवा गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली. सफार इंडियाच्या मते, गुरुवारी सकाळी दिल्लीतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 343 नोंदवला गेला, जो ‘अत्यंत खराब’ श्रेणीत आहे. त्याच वेळी, नोएडामधील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 397 आहे, जो ‘अत्यंत खराब’ श्रेणीत आहे.