ओतूर -येथील मोनिका चौक ते वाकमळा चौकनजीक दुपारी 4 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान शेकडो माल वाहतूक गाड्या बेशिस्त पार्किंग केलेल्या असल्याने महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओतूर येथे काही दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह असलेले दोन पेशंट मिळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर ओतूर परिसरात लॉकडाऊन सुरू आहे. बाजार समितीचे कामकाज ठप्प झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वाशी, पुणे, नगर आदी शहरातील तरकारीचे व्यापारी ओतूर गावालगत असलेल्या नगर-कल्याण महामार्गालगत खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. त्यांनी आणलेले वाहन हायवेचे भान न ठेवता पार्किंग केले जात आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना आपल्या स्वतःच्या घराकडे जाणेही मुश्कील झाल्याची खंत सुनील पाटील डुंबरे यांनी व्यक्त केली.